Monday, 29 July 2019

ख्यातनाम गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार ' तर स्वप्नील जोशी व गीतकार श्री. ना. धों. महानोर यांना 'स्वामीभूषण राज्यस्थरीय पुरस्कार" प्राप्त


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट यांचा ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधुन अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ प्रथम वर्षीय स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय ह्या तीन पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पहिल्या स्वामीरत्न पुरस्काराच्या मानकरी पद्मविभूषण आशा भोसले ठरल्या असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर यांना स्वामीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्वामीरत्न पुरस्काराबरोबरचं  रुपये 5 लाख, मानपत्र, सन्मानचिन्ह, स्वामींचे कृपावस्त्र, मूर्ती स्वरुप देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय स्वामीभूषण पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपये मानपत्र, सन्मानचिन्ह, स्वामींचे कृपावस्त्र, मूर्ती समावेश आहे. लेखक - फिल्ममेकर अनुशा श्रीनिवासन अय्यर यांचा हि ह्या पुरस्कार सोहळ्यात अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पद्मश्री पं.हृदयनाथ मंगेशकर व राज्यगुप्तचर वार्ताचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, आ.सिध्दाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जन्मेजयराजे भोसले, अमोलराजे भोसले, अलका भोसले, अर्पिता भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, अनुषा अय्यर, आरती लिंगायत, कृषीभूषण विश्वासराव कचरे, अण्णा थोरात, बाळासाहेब धाबेकर, महेश इंगळे, संतपराव शिंदे, अभय खोबरे, शामराव मोरे, अभय दिवाणजी, चंद्रकांत कापसे आदीजण उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अलका भोसले यांनी आशा भोसले यांचे स्वागत केले.

आशा भोसले म्हणतात की, "अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले स्मरणार्थ अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्यासाठी पवित्र व प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नगरीत मी पहिल्यांदाच येते अन् एवढ्या मोठ्या प्रमाणात जन्मेजयराजे भोसले यांनी राष्ट्रीय स्तरावरचा मानाचा पुरस्कार देवून सन्मानित केले, हे माझे भाग्य आहे. जन्मेजय भोसले महान कार्य करीत असून त्यांचे हे धार्मिक कार्य भविष्यात वाढतच जाणार आहे." अशाप्रकारे भरभरून बोलत असताना जीवनातील काही किस्से, गायिलेली गाणे, ज्येष्ठ कवी महानोर, अभिनेता स्वप्नील जोशी, हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्याचे देखील कौतुक करुन त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या बरोबरच जीवनातील जडणघडणी विषयी माहिती दिली. आशा भोसले यांनी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या प्रश्नावर मनमुराद उत्तर दिली. यावेळी त्यांनी काही भावगीते देखील गायिली.

राज्यस्तरीय पुरस्कारार्थी ना.धों. महानोर यांनी सांगितले "अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी मला मानाचा पुरस्कार देवून स्वामीरुपी आशीर्वाद मिळाला आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या मातीचा टिळा माझ्या शेतातील मातीत मिसळणार आहे, असे सांगून मंगेशकर कुटूंबियांनी रचलेली गाणी याबाबतची माहिती देवून त्यांनी रचलेल्या कविता आपल्या भाषणातून विशद केले. मंगेशकर कुटूंबियाचे योगदान आणि जन्मेजयराजे भोसले यांनी दिलेला पुरस्कार मी कधीही विसरणार नाही."

सिनेअभिनेता स्वप्नील जोशी याप्रसंगी म्हणाले, "अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी 'स्वामींचा पुरस्कार' देऊन केलेले माझे कौतुक हा त्यांचा आशीर्वाद असून स्वामींचा प्रसाद असल्याचे माझ्या आई-वडिलांनी सांगितले आहे. मी आज स्वामीकृपेमुळेच जीवनात यशस्वी झेप घेत आहे. मुख्य बाब म्हणजे आशा भोसले जी आणि ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या समवेत मला हा पुरस्कार मिळाला. आज ह्या मंचावर मंगेशकर कुटूंबासोबत स्थानापन्न आहे ज्यांच्या आजवर गायलेल्या प्रत्येक गीताचा मी फॅन आहे."

कार्यक्रमादरम्यान ४ हजार मुलाखत घेणारे सुधीर गाडगीळ यांचा सत्कार सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हिरकणी संस्थेच्यावतीने देखील आशा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. गणेश-करे पाटील यांनी मिळवलेली पुरस्काराची रक्कम ११ हजार रुपये व स्वत:चे ११ हजार रुपये असे २२ हजार रुपये रोख अन्नछत्र मंडळास अन्नदान देणगी म्हणून जन्मेजयराजे भोसले यांच्याकडे सुर्पूद केली. स्वामीसेवक जिल्हास्तरीय पुरस्कार गणेश चिवटे श्रीमरा प्रतिष्ठान करमाळा, गणेश करे-पाटील यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळा, प्रा.हिंदुराव गोरे रॉबिनहुड आर्मीचे प्रमुख सोलापूर, अनु व प्रसाद मोहिते प्रार्थना फाऊंडेशन सोलापूर, नानासाहेब कदम बार्शी यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह, रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन आणि अन्नछत्र मंडळाचा आढावा मुलाखतकार सुधीर गाडगीळ तर आभार श्वेता हुल्ले यांनी मानले.

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले सांगतात की, "श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट यांचा ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधुन अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ प्रथम वर्षीय स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय ह्या तीन पुरस्कार सोहळ्यास पद्मविभूषण आशा भोसले, मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर यांसारख्या मान्यवरांस सन्मानित करण्याचे अहोभाग्य आम्हांस लाभले असून पद्मश्री पं.हृदयनाथ मंगेशकर व राज्यगुप्तचर वार्ताचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांसारखे दिग्गज अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळे आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत."

यावेळी अन्नछत्र मंडळास आयएसओ मानांकन व आयएसओ प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते जन्मेजयराजे भोसले व अमोलराजे भोसले यांना या सोहळ्याप्रसंगी प्रदान करण्यात आले. यावेळी संजय राऊळ, लाला राठोड, राजशेखर लिंबीतोटे, अशोक किणीकर, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, संदीप फुगे-पाटील, डॉ.हरिष अफझलपूर, अ‍ॅड.नितीन हबीब, पो.नि.कलप्पा पुजारी, पो.नि.विजय जाधव, दिलीप सिध्दे, डॉ.अंधारे, डॉ.दामा, प्रा.भिमराव साठे, शिरीष मावळे, प्रविण देशमुख, राजु नवले, संजय गोंडाळ, गणेश भोसले, शितल फुटाणे, मनोज निकम, सनी सोनटक्के, गोविंदराव शिंदे,  प्रसाद हुल्ले, दत्ता माने, प्रशांत शिंदे, शरद भोसले, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी, मंडळाचे सेवेकरी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment